Type Here to Get Search Results !

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन | marathwada mukti sangram din essay speech in marathi

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन| Marathwada mukti sangram din essay speech in marathi 2022 PDF


नमस्कार मित्रांनो आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन बघणार आहोत.


आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ प्रमुख पाहुणे, वंदणीय गुरुजनवर्ग आणि निजामाच्या गुलामगिरीतुन आपल्या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी बलिदान दिलेल्या असंख्य हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी उपस्थित बंधू आणि भगिणींनो........

आज मराठवाडा मुक्ती दिन. सर्वांना पवित्र मराठवाडा स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


निजाम रझाकार अन् निसर्गाशीही अमुची लढाई 
क्रांतिकारी इतिहास अन् पराक्रमी अमुचा वाणा ...... 
संग्रामवीरांचा मराठवाड्याचा आम्हा सदैव अभिमान 
राष्ट्रभक्ती, उन्नतीसाठी नेहमीच अमुचा ताठ कणा.........


प्रथमतः देशभक्त स्वामी रामानंद तीर्थ हुतात्मा गोविंदराव पानसरे,  रविनारायण रेड्डी, गोविंदभाई थॉफ, देवीसिंग चौहान, बाबासाहेब परांजपे आदि. मराठवाडा मुक्ती संग्रामातील प्रभावी नेतृत्व अन् ज्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी मराठवाडा मुक्तीसाठी आपले बलिदान दिले अशा सर्व वीरांना मानाचा मुजरा करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला. सारा देश स्वातंत्र्यरुपी गोड फळ चाखत होता. स्वातंत्र्याचा. मुक्तीचा आनंद साजरा होत होता. स्वतंत्र भारताची सुखद स्वप्ने पाहण्यात सारे देशबांधव मग्न होते.

पण...... पण त्याचवेळी मात्र भारतातील ५६५ संस्थांनांपैकी हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ हि ३ संस्थाने मात्र स्वातंत्र्याची वाट पाहत गुलामगिरीचा कडवटपणा अनुभवत होती. स्वतंत्र भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न पाहत होती.

त्यातील हैदराबाद हे क्रूर निजामाच्या राजवटीतील मोठे संस्थान. मराठवाडा हे हैदराबाद संस्थानातील महत्वाचा भाग होता.


कधी संपेल माझी गुलामगिरी? 
कधी संपेल माझ्यावरील अन्याय? 
कधी संपेल माझे पारतंत्र्य?


यांसारखे असंख्य प्रश्न माझ्या मराठवाड्यातील जनता नियतीला विचारत होती.

एकाच भारतमातेची लेकरं.. पण काहींना एक न्याय अन् काहींना वेगळा न्याय का? असा विचार करत मराठवाडा आतुन धगधगत होता, बैचेन झाला होता.

पण हेच प्रश्न, हेच विचार, हेच अन्याय आपल्या क्रांतीकारी | मराठवाड्यातील देशभक्तांना शुरवीरांना झोप येऊ देत नव्हते.

सर्वांच्या एकीने. एकविचाराने अन् एकदिलाने सुरु झाला मराठवाडा मुक्ती संग्राम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण हैदराबाद संस्थान एक झाले. या संग्रामाचा वेग आणि प्रभाव इतका जबरदस्त होता की अवघ्या काही दिवसांत प्रत्येक गावागावात हा वणवा पेटला. असंख्य स्वातंत्र्यवीर | या संग्रामात स्वतःहून सहभागी झाले.

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यपर्वांमधील सर्वांत मोठे आणि प्रभावी पर्व म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम.

पण अशातच मुक्तीसंग्राम सुरु झालाय हे लक्षात येताच निजामाने अन् त्याचा सेनापती कासीम रझवी यांनी जनतेवर अनन्वित अत्याचार आणखी वाढविले. लोकांना त्रस्त केले. रझाकार नावाच्या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादाखाली सारा मराठवाडा भरडत होता.

गोविंदराव पानसरे हे या संग्रामातील पहिले हुतात्मा.पण त्यांचे हौतात्म्य मराठवाड्यातील क्रांतिकारकांनी वाया जाऊ दिले नाही. मराठवाडा आणखी वेगाने संघटित झाला. एकीकडे निजाम संस्थान हे वेगळे राष्ट्र करण्याचे स्वप्न बघत होता तर माझी मराठवाड्यातील जनता ही भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न बघत होती. निजामाचे हे नीच स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी संपूर्ण मराठवाडा एक झाला.

निजाम शरण येत नाही उलट जनतेवरील अन्याय आणखीच वाढले हे लक्षात येताच भारताच्या प्रशासनाने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाविरुद्ध लष्करी मोहिम सुरु केली. तिचे नाव होते पोलीस अँक्शन.

१३ सप्टेंबरला वायव्य दिशेने औरंगाबादमधून, पश्चिम दिशेने सोलापूरहून, ईशान्य दिशेने आदिलाबादहून, दक्षिण दिशेने कुर्नानुलहून आणि आग्नेय दिशेने विजयवाडाहून अशा ५ दिशांनी हैदराबाद संस्थानात सैनिकांच्या ५ तुकड्यांनी प्रवेश केला. आणि अवघ्या ५ दिवसांत म्हणजेच १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामशाहीचा अंत केला. निजामाला संस्थानातून हद्दपार केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम यशस्वी झाला.

मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारत देशाच्या अधु-या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले. मराठवाडा स्वतंत्र भारत देशाचा एक भाग झाला.

मुंबई राज्याचा आणि नंतर महाराष्ट्र राज्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मराठवाड्याला महत्त्व प्राप्त झाले.

किती मोठा संग्राम किती महान क्रांतिकारकांची बलिदाने, किती मोठा संघर्ष किती मोठा इतिहास.

हे सारे कशासाठी? 
तर महान भारताच्या अखंडत्वासाठी....

निसर्गाने स्वातंत्र्य देताना ११ महिन्यांचा अन्याय केलाच पण सातत्याने दुष्काळसदृश्य भौगोलिक परिस्थिती देऊन सदैव अन्याय करतच आहे पण माझा मराठवाडा क्रांतिकारी इतिहासाची ऊर्जा घेत, आलेल्या समस्यांना सामोरे जात ताठ मानेने जगत आहे. मराठवाड्याने देशाला क्रांतिकारी इतिहास दिला. विविध राजकीय नेतृत्व  देऊन राज्याला अन् देशाला राजकीयदृष्ट्या समर्थ बनविले.

औरंगाबादमधील प्रसिद्ध लेण्या, बीडमधील ज्योतिर्लिंग, मराठवाड्याची शैक्षणिक पंढरी आंबेजोगाई, नांदेडमधील भव्यदिव्य गुरुद्वारा लातुरमधील ऐतिहासिक गंजगोलाई अन हिंगोलीमधील औंढा नागनाथ देवस्थान आदि वास्तू देशाच्या सौदर्यात भर टाकत आहेत.

भविष्यात आपल्या मराठवाड्याला शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, कृषी अन राजकीय क्षेत्रात आणखी प्रगत करण्यासाठी आपण एक होऊया. प्रयत्न करुया आणि भारताच्या अखंडत्वासाठी लढलो आता महासत्ता बनविण्यासाठी लढूया.

 धन्यवाद जय हिंद जय भारत.

हे पण वाचा - 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !